"पाटीवरची मैत्री, मॅटवरचा पराक्रम – पप्पू शिरसाट यांना भावपूर्ण श्रद्धांजली"
"राजेंद्र उर्फ पप्पू”
"पाटीवरची मैत्री, मॅटवरचा पराक्रम – पप्पू शिरसाट यांना भावपूर्ण श्रद्धांजली"
लेखक : प्रा. अजय ब. कोंगे
शिरसाटवाडी हे नाव पाथर्डी तालुक्यात अनेक जणांसाठी ओळखीचं असेल. पण या गावाला देशपातळीवर क्रीडा क्षेत्रात नाव मिळवून देणाऱ्या एका असामान्य, मित्रप्रेमी आणि खेळाडू व्यक्तिमत्त्वाची ओळख सांगायची म्हणजे “राजेंद्र उर्फ पप्पू” शिरसाट. माझ्यासाठी पप्पू फक्त एक खेळाडू नव्हता, तो एक जिवाभावाचा मित्र होता. तो माझ्यापेक्षा दोन वर्षांनी मोठा, पण आमच्यातली मैत्री वयाचं अंतर विसरून गेलेली. एकत्र पोहायला जाणं, वेगवेगळ्या मैदानांवर खडतर सराव करणं, ‘जय बजरंग व्यायाम शाळा’त घोडके मामा यांचं मार्गदर्शन घेऊन कुस्तीचे धडे गिरवणं तालुक्यातील आणि जिल्हातील वेगवेगळ्या गावच्या हंगामा (फडाला) जाणे आमचं बालपण, तारुण्य, आणि मैत्री याच मातीवर घडली.
वडिलांचा वारसा, क्रीडाक्षेत्र आवडता छंद
पप्पूच्या अंगी खेळाचं बाळकडू त्याच्या वडिलांकडून आलं होतं आदरणीय कै. महादेव शिरसाट सर. शाळा आणि समाज कार्यासाठी झटणारे, विद्यार्थ्यांच्या पाठीशी ठाम उभे राहणारे, निस्वार्थी वृत्तीचे, निर्मळ मनाचे शिक्षक. त्यांचं मार्गदर्शन हे आम्हा सर्वांसाठी दीपस्तंभ ठरले. पप्पूने हा वारसा मनापासून स्वीकारला आणि क्रीडा क्षेत्रात स्वतःचं स्थान निर्माण केलं. राजेंद्र (पप्पू) सर यांची पाथर्डी तालुका क्रीडा शिक्षक समितीच्या अध्यक्षपदी सलग पाचव्यांदा बिनविरोध निवड झाली. त्यांच्या नेतृत्वाखाली तालुकास्तरावर क्रीडा क्षेत्रात सातत्याने उत्कृष्ट कामगिरी करण्यात आली विद्यार्थ्यांना विविध खेळांतील संधी उपलब्ध करून देत त्यांच्यातील कौशल्यांना व्यासपीठ दिले त्यांनी कुस्ती, बुद्धिबळ, व्हॉलीबॉल आदी खेळांमध्ये तालुकास्तर ते राष्ट्रीय स्तरापर्यंत विद्यार्थ्यांना यश मिळवून दिले. नवीन ‘न्यू आयडियल कॉलेज’च्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
कुस्ती – नुसती कसरत नव्हे, तर भक्ती :
लाल मातीशी त्याची मैत्री लवकरच भक्तीत परिवर्तित झाली. कुस्ती ही त्याच्यासाठी केवळ खेळ नव्हती, ती त्याची उपासना होती. शालेय पातळीपासून ते विद्यापीठीन स्तरापर्यंत त्याने अतुलनीय यश संपादन केलं. कधी असा प्रसंग यायचा की शालेय कुस्ती स्पर्धेत त्याच्या वजनगटात कोणीच उतरायचं धाडस करायचं नाही. तालुकास्तर – जिल्हास्तर – विद्यापीठ – आंतरविद्यापीठ – राष्ट्रीय स्पर्धा, सर्व ठिकाणी त्याची कामगिरी असामान्य होती. त्याच्या कुस्तीचं एक वेगळंच कौशल्य होतं. मॅटवरचा त्याचा आत्मविश्वास, हालचालीतील अचूकता, आणि समोरच्याला चितपट करण्याची शैली, हे सर्व पिढ्यान् पिढ्या सांगावं असं होतं. त्याने अनेक पदकं, गौरव, ट्रॉफी, आणि शाबासकी मिळवली. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे, त्याने *छोट्याशा गावाचं नाव देशपातळीवर नेऊन ठेवलं* – हेच त्याचं खरं यश.
शिक्षक म्हणून भूमिका
आम्ही दोघं एकलव्य शिक्षण संस्थेच्या कै. सौ. सुमनताई ढाकणे अध्यापक विद्यालयात तब्बल १४ वर्षे एकत्र काम केलं. ते क्रीडा शिक्षणात, मी संगणक शिक्षणात. पण आमच्यातील बंध हे व्यावसायिक नात्यापेक्षा खूप मोठं होतं मैत्री, जिव्हाळा, कौटुंबिक प्रेम. आमचे संस्था सचिव सध्या अध्यक्ष आदरणीय प्रतापकाका ढाकणे आमच्यावर खूप प्रेम करत होते. पप्पू शिरसाट एक आदर्श शिक्षक होता. विद्यार्थ्यांमध्ये तो मिसळून जात असे. कुणाचा छंद समजून घ्यायचा, त्याला प्रोत्साहन द्यायचं, त्याच्या आई-वडिलांशी संवाद साधायचा हे सारे गुण त्याच्यात होते. व्यायाम, आहार, मानसिक तयारी याबाबतीत तो अत्यंत जागरूक होता. त्याने अनेक विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रात मार्ग दाखवला.
मैत्रीचा एक चेहरा हरवला
माझ्यासाठी हा लेख लिहिताना माझ्या मनात विचारांचे काहूर माजले आहे. काही दिवसांपूर्वी एका लग्न कार्यक्रमात आमची भेट झाली होती. भरभरून बोललो, जुन्या आठवणी जाग्या झाल्या, खूप हसलो. आणि तो हसरा चेहरा शेवटचाच ठरेल, याची पुसटशीही कल्पना नव्हती. त्याने आयुष्यात अनेक धक्के धैर्याने पचवले. पण नियतीची अखेरची कुस्ती त्याच्या मनगटाच्या पलिकडची होती. त्याला नमावं लागलं. हे सगळं एखाद्या चित्रपटासारखं डोळ्यांसमोर तरळतंय. आपली कौटुंबिक नाळ आज तुझ्या अकस्मात जाण्याने पोरकी झाली. राष्ट्रीय पातळीवर कुस्ती खेळलेला तू क्रिडा शिक्षक, आपल्या तालुक्यातल्या असंख्य खेळाडूंना घडवणारा तू, परिस्थिती कितीही कठीण असली तरी पूर्ण डाव खेळणारा तू आणि आज तूच आयुष्याचा डाव अर्धवट सोडून निघून गेलास. तुझ्या कुटुंबाच्या पाठीशी आम्ही नक्की उभे राहू, त्यांची काळजी घेऊ, पण त्यांच्या आयुष्यातील तुझ्या उणीवेची जागा मात्र कोणीच घेऊ शकणार नाही. तुझ्या आयुष्यावर घाला घालणाऱ्या या बेभरवशाच्या नियतीला क्षमा करणं कठीण आहे रे! पण जिथं असशील, तिथं तसाच हसतमुख, आनंदी आणि प्रेरणादायी रहा हेच एक मित्र म्हणून तुझ्यासाठी माझं अंतिम वचन!
पप्पू सर म्हणजे काय?
पप्पू म्हणजे परिश्रमाचा दुसरा अर्थ
पप्पू म्हणजे खेळाडूपणाचा आदर्श
पप्पू म्हणजे गावाचा मानबिंदू
पप्पू म्हणजे मित्रांची शान
पप्पू म्हणजे शिक्षकांची जबाबदारी
आणि माझ्यासाठी – *पप्पू म्हणजे माझं मनगट*… माझा मोठा भाऊ.
अश्रूंच्या ओळींमध्ये आठवणी
आज तो आपल्यात नाही. पण तो आपल्या आठवणींत, प्रत्येक विद्यार्थ्याच्या विजयात, मॅटवरच्या प्रत्येक चालीत, आणि मैत्रीतल्या प्रत्येक हास्यात जिवंत राहील. त्याची मेहनत, त्याची साधना, त्याची निष्ठा – या गोष्टी आम्हाला कायम स्फूर्ती देत राहतील. श्रद्धांजली राजेंद्र उर्फ पप्पू शिरसाट सर, तुमचा चेहरा नजरेतून नाहीसा झाला असला, तरी आठवणींमध्ये, स्मृतींच्या वळणावर तुमचं अस्तित्व अजूनही ठसठशीत आहे., तुमचं स्वप्न अपूर्ण राहू देणार नाही, तुमच्या पावलावर पाऊल ठेवून पिढ्या पुढे जातील – हीच खरी श्रद्धांजली. भावपूर्ण श्रद्धांजली!
तुझा लहान भाऊ मित्र प्रा. अजय बबनराव कोंगे शिरसाटवाडी.