लोककलेला मिळालेली संजीवनी : रघुवीर खेडेकर यांना भारत सरकारचा पद्मश्री सन्मान...


लोककलेला मिळालेली संजीवनी : रघुवीर खेडेकर यांचा पद्मश्री सन्मान

भारतीय लोकसंस्कृतीच्या समृद्ध परंपरेत तमाशा ही केवळ एक करमणुकीची कला नसून ग्रामीण जीवनाची संवेदना, संघर्ष आणि उत्सव यांचे जिवंत प्रतिबिंब आहे. या लोककलेला जिवंत ठेवण्यासाठी ज्यांनी आयुष्य वेचले, अशा लोकनाट्य तमाशा क्षेत्रातील ज्येष्ठ व दिग्गज कलाकार रघुवीर खेडेकर यांना भारत सरकारतर्फे २०२६ चा पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. तमाशा या लोककला प्रकारातील त्यांच्या प्रदीर्घ, निष्ठावंत आणि समर्पित योगदानाची ही योग्य पावती असून, या घोषणेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात कौतुकाचा वर्षाव सुरू झाला आहे.

गेल्या चार दशकांहून अधिक काळ रघुवीर खेडेकर यांनी तमाशा रंगभूमीवर अखंडपणे कार्य केले आहे. त्यांच्या कार्याची मुळे केवळ रंगमंचापुरती मर्यादित नसून, तमाशा या लोककलेच्या जतन, संवर्धन आणि नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याच्या ध्येयाशी घट्ट जोडलेली आहेत. त्यांच्या मातोश्री आई कातांबाई सातारकर यांनी स्वबळावर सुरू केलेला तमाशा फड त्यांनी अत्यंत जिद्द, कष्ट आणि चिकाटीने आजतागायत यशस्वीपणे सांभाळला आहे. ही परंपरा पुढे नेणे हे त्यांच्या आयुष्याचे व्रतच ठरले आहे.

रघुवीर खेडेकर हे केवळ एक कलाकार नसून ते तमाशा क्षेत्रातील मार्गदर्शक, संघटक आणि नेतृत्व करणारे व्यक्तिमत्त्व आहेत. महाराष्ट्र राज्य ढोलकी फड तमाशा संघटनेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी कलाकारांचे प्रश्न, हक्क, मानधन, सन्मान आणि सामाजिक प्रतिष्ठा यांसाठी सातत्याने आवाज उठवला. तमाशा फड मालक आणि कलाकार या दुहेरी भूमिकेतून त्यांनी तमाशा क्षेत्रातील अनेक कलाकारांना आधार, दिशा आणि व्यासपीठ उपलब्ध करून दिले.

आजच्या बदलत्या काळात लोककलेचे अस्तित्व टिकवणे हे मोठे आव्हान आहे. व्यावसायिक स्पर्धा, बदलती अभिरुची आणि आर्थिक अडचणींमुळे अनेक लोककलाकार संघर्ष करत आहेत. अशा परिस्थितीत रघुवीर खेडेकर यांना मिळालेला पद्मश्री पुरस्कार हा केवळ व्यक्तीगत सन्मान नसून संपूर्ण लोककला क्षेत्रासाठी संजीवनी ठरणारा आहे. या सन्मानामुळे लोककलाकार जिवंत आहेत, त्यांचे कार्य मोलाचे आहे आणि त्यांच्या कलेला राष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळू शकते, हा आश्वासक संदेश समाजात पोहोचला आहे.

रघुवीर खेडेकर यांचा हा गौरव तमाशा कलेच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रेरणादायी ठरेल. नव्या पिढीतील कलाकारांना आत्मविश्वास देणारा आणि लोककलेच्या जतनासाठी नवी ऊर्जा निर्माण करणारा हा क्षण आहे. भारतीय लोकसंस्कृतीचे वैभव जपणाऱ्या अशा कलावंतांना मिळणारा सन्मान म्हणजे आपल्या सांस्कृतिक अस्मितेचा विजयच होय.

रघुवीर खेडेकर यांचे कार्य, त्यांची निष्ठा आणि लोककलेवरील प्रेम यांना हा पद्मश्री पुरस्कार समर्पक आहे. त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देत, तमाशा आणि इतर लोककलांना अधिक व्यापक मान्यता व सन्मान मिळो, हीच अपेक्षा.

शब्दरचना : प्रा अजय बी कोंगे 

Skill

*मी उद्योजक होणार*

Two Day National level Workshop On E-Content Skill Development (Educational Video Production)