घोडावत' मधून ५००० हुन अधिक विद्यार्थी झाले कौशल्य विकसित
घोडावत' मधून ५००० हुन अधिक विद्यार्थी झाले कौशल्य विकसित
संजय घोडावत शिक्षण संकुलाच्या कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागांतर्गत आज अखेर ५००० हुन अधिक गरजू सुशिक्षित बेरोजगार युवक युवतींना तांत्रिक कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम, कार्यशाळा आणि जाणीव जागृती कौशल्य विकास मार्गदर्शन मेळाव्याच्या माध्यमातून विविध क्षेत्रातील कौशल्याचे ज्ञान देऊन त्यांना कुशल बनविण्यात आले आहे. अशी माहिती विश्वस्त विनायक भोसले व कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागाचे प्रमुख समन्वयक प्रा.अजय बी. कोंगे यांनी जागतिक युवा कौशल्य दिनाच्या निमित्ताने प्रसिद्धिप्रत्रकाद्वारे कळविली आहे.
यामध्ये प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना, जिल्हा उद्योग केंद्र, सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी, नॅशनल इन्स्टिटयूट ऑफ सोलर एनर्जी, बार्टी, उद्योजकता विकास कार्यक्रम,एमसीइडी, मिटकॉन व महिला आर्थिक विकास महामंडळ या शासकीय योजनेअंतर्गत मोफत विद्यावेतनासह सुशिक्षित बेरोजगारांचे कौशल्य विकसित करून नोकरी व उद्योग उभारण्यासाठी सक्षम बनविले आहे.
तसेच प्रशिक्षण घेणाऱ्या प्रशिक्षणार्थीना शासनाच्या योजना अंतर्गत विद्यावेतन ६ लाख ९४ हजार आणि विभागाला २१ लाखाहून अधिक अनुदान प्राप्त झाले आहे.
केंद्र व राज्य शासनाने सुरू केलेला राष्ट्रीय कौशल्य विकास कार्यक्रम म्हणजे आपल्या देशातील तरुणांना आवश्यक कौशल्ये देऊन त्यांना सक्षम करणे जेणेकरुन ते देशाच्या प्रगतीसाठी हातभार लावणाऱ्या नोकरदार, उद्योजक तरुणांमध्ये बदल घडवू शकतील. संजय घोडावत शिक्षण संकुलामधील कौशल्य विकास आणि उद्योजकता विभाग युवक युवतींना शासकीय अनुदानित मोफत कौशल्य अभ्यासक्रम उपलब्ध करवून देत आहे. व्यक्तिमत्त्व विकास, उद्योजकीय कौशल्ये, जीवन कौशल्ये, इंग्रजी संप्रेषण, वेळ व्यवस्थापन कौशल्य, संगणक कौशल्य, आरोग्य आणि जागरूकता, नोकरी मुलाखतीची कौशल्ये यासह विविध तांत्रिक अभ्यासक्रम या विभागामार्फत राबविले जात आहेत. याचबरोबर नवीन उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी ‘स्टार्टअप’ 'मुद्रा योजना', मुख्यमंत्री रोजगार निर्मित कार्यक्रम, एम.एस.एम.ई., यासारख्या विविध शासकीय योजनांचे मार्गदर्शन आणि प्रशिक्षण विद्यार्थ्यांना दिले जाते. या विभागाला जिल्ह्यातील 10वी, 12वी, पदवीधर सुशक्षित बेरोजगार युवक युवतींचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
याबद्दल अध्यक्ष संजय घोडावत, विश्वस्त विनायक भोसले, कुलगुरू डॉ.अरुण पाटील, प्राचार्य विराट गिरी, संचालक डॉ.व्ही.व्ही.कुलकर्णी यांनी विभागाचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या.