संजय घोडावत यांना यंदाचा पुणे फेस्टिवल पुरस्कार प्रदान
संजय घोडावत यांना यंदाचा पुणे फेस्टिवल पुरस्कार प्रदान
जयसिंगपूर :आंतरराष्ट्रीय ख्याती असलेल्या 35 व्या पुणे फेस्टिवल मध्ये उद्योगपती संजय घोडावत यांना उद्योग, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल 22 सप्टेंबर रोजी गणेश कला क्रीडा मंडळ रंगमंच येथे राज्याचे पर्यटन मंत्री गिरीश महाजन,पुणे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले पुणे फेस्टिवल चे अध्यक्ष माजी खासदार सुरेश कलमाडी यांच्या हस्ते यंदाचा पुणे फेस्टिवल पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
यावेळी खा. श्रीरंग बारणे खा.रजनी पाटील खा.हेमामालिनी उपस्थित होत्या.कला,क्रीडा,उद्योग, सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना आतापर्यंत हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना संजय घोडावत म्हणाले, की या मानाच्या पुरस्कारासाठी माझी निवड केल्याबद्दल आयोजकांचा मी खूप आभारी आहे.तसेच घोडावत उद्योग समूहाकडून सामाजिक, शैक्षणिक,उद्योग क्षेत्रात महाराष्ट्रात व देशात अखंडित कार्य सुरू राहील. त्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू.
संजय घोडावत यांनी घोडावत विद्यापीठ, इंटरनॅशनल स्कूल, पॉलिटेक्निक, आयआयटी व मेडिकल अकॅडमी ची उभारणी अतिग्रे येथे केली आहे. या माध्यमातून सांगली, कोल्हापूर आणि देश विदेशातील विद्यार्थ्यांना उत्कृष्ट सोयीसुविधांनी युक्त दर्जेदार शिक्षणाची संधी निर्माण झाली आहे. बेळगाव येथे इंटरनॅशनल स्कूल ची स्थापना करून कर्नाटक राज्यात देखील संजय घोडावत यांनी शिक्षण क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवला आहे. केजी टू पीएचडी पर्यंतचे शिक्षण देणाऱ्या शिक्षण संकुलाची निर्मिती संजय घोडावत यांनी केली आहे.त्यांच्या दूरदृष्टीमुळे विविध क्षेत्रात येथील विद्यार्थी नोकरी, उद्योग धंदा करत आहेत. त्यांना शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाबद्दल राष्ट्रीय व राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. यामध्ये एज्युकेशन वर्ड यांच्याकडून इंटरनॅशनल स्कूल ला 'डे बोर्डिंग कम रेसिडेन्शियल स्कूल' श्रेणीमध्ये महाराष्ट्र राज्यातून प्रथम क्रमांकाचा तर भारतातून तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार देण्यात आला आहे. नुकताच महाराष्ट्राला उद्योग क्षेत्रात प्रथम क्रमांकावर नेण्यासाठी योगदान दिल्याबद्दल संजय घोडावत यांना नवभारत टाइम्स स्क्रोल ऑफ ऑनर पुरस्कार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला आहे.
संजय घोडावत फाउंडेशन च्या वतीने कोरोना काळामध्ये ५ लाख लोकांना अन्नाची पाकिटे वाटण्यात आली. त्यांच्यासाठी फंड उभा करून अन्नपाण्याची सोय करण्यात आली. कोविड केअर सेंटरची उभारणी करून उत्तम अशा आरोग्य सुविधा पुरविण्यात आल्या यामध्ये ३७ हजार पाचशे रुग्णांनी येथे उपचार घेतले. फाउंडेशन च्या वतीने माऊली वृद्धाश्रम येथे सुसज्ज अशा निवाऱ्याची सोय करण्यात आली. याचा फायदा वृद्धाश्रमात राहणाऱ्या अनेक ज्येष्ठांना होत आहे.
सामाजिक कार्याबरोबरच शाश्वत विकासासाठी तीन लाखांच्या वर वृक्षारोपण करण्यात आले. कोल्हापुर सांगली परिसरातील पूरग्रस्तांना मदतीसाठी संस्थेने वेळोवेळी मदतीचा हात दिला आहे. फाउंडेशन मार्फत आचार्य श्री तुलसी ब्लड बँकेची स्थापना करून अनेक रुग्णांना रक्तदान करून जीवदान दिले आहे. गरजू मुलींसाठी स्वखर्चाने १९९५ मध्ये कन्या महाविद्यालयाची सुरुवात केली. ज्याचा लाभ ५२ ग्रामीण भागात राहणाऱ्या ६ हजार विद्यार्थिनी घेतात. त्याचबरोबर मिरज येथे अंध विद्यार्थ्यांसाठी शाळा सुरु करून त्यांचे आयष्य प्रकाशमय करण्याचे महत्वाचे कार्य फाउंडेशन च्या वतीने करण्यात आले आहे.
सध्या घोडावत उद्योग समूहामध्ये 10 हजार कामगार तर शैक्षणिक संकुलामध्ये 18 हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या सर्व सामाजिक कार्याचा गौरव म्हणून हा पुरस्कार देण्यात येत असल्याचा उल्लेख आयोजकांनी केला.
पुणे फेस्टिवल पुरस्कार मिळाल्याबद्दल सामाजिक,राजकीय,औद्योगिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांकडून संजय घोडावत यांचे कौतुक होत आहे.